आमची यशोगाथा
गावाची ओळख
ग्रुप ग्रामपंचायत पिंपळशेत-खरोंडा ही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक सुंदर, निसर्गरम्य आणि आदिवासी संस्कृती जपणारी ग्रामपंचायत आहे. डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेली ग्रुप ग्रामपंचायत पिंपळशेत-खरोंडा आपल्या रूढी, परंपरा आणि सामाजिक एकतेसाठी ओळखले जाते. ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन महसूल गावे पिंपळशेत व खरोंडा आहेत. पिंपळशेत महसूल गावामध्ये पिंपळशेत(गावठाण), विहरीपाडा,आमडीपाडा, टोपलेपाडा, कोतीमाळ, पागीपाडा, वडपाडा आणि खरोंडा महसुल गावामध्ये खरोंडा(गावठाण), हेदिचापाडा, शिंगारपाडा, सुकळीचामाळ, खोमारपाडा, माडविहरा, हुंबरण इत्यादी पाड्यांचा समावेश होतो. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ४२७४ एवढी आहे. त्यापैकी जॉबकार्डधारक संख्या ११८८ एवढी आहे.
शिक्षण व सुविधा
गावात शिक्षण आणि आरोग्य यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा:- ७
अंगणवाडी केंद्रे:- १५
व्यायामशाळा: २
सभामंडप : ६
तसेच गावात सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण योजना, सार्वजनिक विहिरी, शेततळी आणि धार्मिक स्थळे उपलब्ध आहेत, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन अधिक सक्षम झाले आहे.
शेती व उद्योग
पिंपळशेत-खरोंडामधील बहुतेक लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भात, नागली, तूर, उडीद आणि खुरसणी ही गावातील प्रमुख पिके आहेत. मागील काही वर्षात NREGA आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गावात शेततळी बांधकाम, जलसंधारण आणि फळबाग लागवड (मोगरा, आंबा इत्यादी) यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्मिंग) व्यवसाय सुरु करून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये बहुतेक शेतकरी मिरची लागवड करून उत्पन्न मिळवतात.
शासकीय योजना व यश
ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत-
· PMAY व शबरी आवास योजना अंतर्गत अनेक कुटुंबांना घरकुल लाभ मिळाला आहे.
· स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपळशेत ग्रामपंचायतीला सन २०१२ मध्ये 'ODF Plus" दर्जा मिळाला आहे.
लोकसहभाग व ग्रामविकास
ग्रामपंचायतीचा विकास हा सरपंच, उपसरपंच, ९ सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे.
सर्व निर्णय लोकसहभागातून आणि पारदर्शकपणे घेतले जातात.
प्लास्टिकमुक्त व दारूबंदीमुक्त, स्वच्छता अभियान या संकल्पनांवर गावाने ठाम पाऊल टाकले आहे.